Home Breaking News हळदीच्या वाटेवर काळाने गाठले; तरुणीचा जागीच मृत्यू

हळदीच्या वाटेवर काळाने गाठले; तरुणीचा जागीच मृत्यू

0
517

हळदीच्या वाटेवर काळाने गाठले; तरुणीचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तरुणी ठार, दोन जखमी

कन्हान,ता.२० – सुनील सरोदे 

हळदीच्या कार्यक्रमासाठी जात असताना स्कुटीला अज्ञात भरधाव वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेल्या दोन तरुणी जखमी झाल्या. ही घटना रविवारी (दि. १९) रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर वाघोली शिवारात घडली.

मृत तरुणीचे नाव कु. रश्मी विनोद बागडे (वय २३, रा. हनुमान नगर, कन्हान) असे असून जखमींमध्ये कु. तेजस्विनी प्रमोद बावनकुळे (वय २४, रा. इंदिरा नगर) व कु. श्रद्धा दिलीप बंड (वय २४, रा. सुपर टाऊन) यांचा समावेश आहे. तिघी स्कुटी (क्र. एमएच ४० सीएल ७६८९) ने वाघोली येथे मैत्रिणीच्या हळदी कार्यक्रमासाठी जात होत्या.

दरम्यान, एमएचकेएस पेट्रोल पंपाच्या पुढे सुमारे १०० मीटर अंतरावर अज्ञात वेगवान वाहनाने त्यांच्या स्कुटीला जबर धडक दिली. धडकेनंतर मागे बसलेली रश्मी बागडे रस्त्यावर फेकली गेली. वाहन तिच्यावरून गेल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. उर्वरित दोघी स्कुटीसह घसरत गेल्याने जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेजस्विनी बावनकुळे हिची प्रकृती गंभीर असून आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. समाजसेवक अनिल आंबिलढुके यांच्या मदतीने मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

या प्रकरणी जखमी श्रद्धा बंड हिच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान पोलीस करत आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे कन्हान परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here