डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कन्हान- कांद्रीत तीन दिवसीय भव्य कार्यक्रम
कन्हान, ता.१३ – सुनील सरोदे

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कन्हान-कांद्री येथे तीन दिवसीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असून शहरात उत्साहाचे वातावरण आहे.

सोमवार (दि. १३ एप्रिल) रोजी सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत ‘जयभीम वाल्याची शान’ हा प्रबोधनात्मक डान्स-ड्रामा कार्यक्रम प्रियदर्शन सोनटक्के व संच, नागपूर यांच्या सादरीकरणातून रंगणार आहे. त्यानंतर रात्री १२ वाजता ‘जयभीम सलामी’ देत केक कटिंग व फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे.

मंगळवार (दि. १४ एप्रिल) रोजी सकाळी ९ वाजता महापुरुषांना मानवंदना अर्पण करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता संविधान जनजागृती कार्यक्रम स्वप्निल फुसे व संच, नागपूर यांच्या वतीने होणार आहे. बुद्धिस्ट वेलफेअर सोसायटीतर्फे सिद्धार्थ कॉलनी, गणेश नगर येथील बुद्ध विहारात सकाळी ११.३० वाजता डॉ. पूजा रामटेके व डॉ. सुमेध रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली त्वचा व हृदयविकार तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी भोजनदान कार्यक्रम होणार आहे.








