कन्हानमध्ये तीव्र पाणीटंचाई; संतप्त नागरिकांचा नगर परिषदेला घेराव
पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती; प्रशासनाविरोधात जनक्षोभ, लोकप्रतिनिधींवरही नाराजी
कन्हान,ता.०५- सुनील सरोदे
कन्हान-पिपरी शहरात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर अखेर नागरिकांचा संयम सुटला. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना अक्षरशः वणवण भटकावे लागत असल्याने संतप्त नागरिकांनी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले. कन्हान यूथ फाउंडेशनचे संयोजक कॅप्टन सतीश किशोर बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी नगर परिषद कार्यालयाला घेराव घालत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

“पाणी द्या, नाहीतर खुर्ची खाली करा”, “तहानलेल्या जनतेला न्याय द्या”, “झोपलेल्या प्रशासनाला जागे करा” अशा घोषणांनी नगर परिषद परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकारी दीपक घोडके यांचा सुमारे तासभर घेराव घालत पाणीपुरवठ्याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली.

कन्हान-पिपरी शहरातील सतरापूर, शिवनगर, एमजी नगर, स्वामी विवेकानंद नगर, पिपरी, रामनगर, वाघधरे वाडी, गणेशनगर आदी भागांमध्ये अनेक दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार आहे. काही ठिकाणी अत्यल्प दाबाने पाणी येत असून अनेक वस्त्यांमध्ये दिवसन्दिवस नळ कोरडे असल्याचे नागरिकांनी सांगितले.

पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका महिला आणि लहान मुलांना बसत आहे. पहाटेपासून हंडे, बादल्या आणि पाण्याची भांडी घेऊन महिलांना पाण्याच्या शोधात फिरावे लागत आहे. अनेक कुटुंबांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेत पिण्याच्या पाण्यासाठी होणारी धावपळ नागरिकांच्या संतापात भर घालत आहे.

नागरिकांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रत्येक निवडणुकीत विकासाची आश्वासने दिली जातात; मात्र पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा आजही नागरिकांना मिळत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. वर्षानुवर्षे ही समस्या कायम असतानाही दीर्घकालीन जलयोजना राबविण्यात अपयश आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.मोर्चादरम्यान कॅप्टन सतीश बेलसरे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “जनतेचा संयम आता संपत चालला आहे. पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. तातडीने प्रभावी उपाययोजना न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”
दरम्यान, प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र नागरिकांना आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा असल्याचे आंदोलनातून स्पष्ट झाले. कन्हान-पिपरीतील वाढता जनक्षोभ हा केवळ पाणीटंचाईचा प्रश्न नसून स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोरील विश्वासार्हतेची मोठी कसोटी ठरत आहे. आगामी काळात या प्रश्नावर कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
दीपक घोडके (मुख्याधिकारी, नगरपरिषद कन्हान-पिपरी)
“कन्हान-पिपरी शहरातील पाणीटंचाईची समस्या नगरपरिषद अत्यंत गांभीर्याने हाताळत आहे. सतरापूरसह ज्या भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा पोहोचत नाही, त्या ठिकाणी तातडीने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. कोणताही नागरिक पाण्याविना राहू नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नवीन पाईपलाईन व जलशुद्धीकरण सुविधांचे काम युद्धपातळीवर सुरू असून पुढील एक ते दीड महिन्यात ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नगरपरिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत नियमित बैठका घेऊन प्रत्येक प्रभागातील पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, विद्युत व इतर नागरी समस्यांचा आढावा घेतला जात आहे.नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची दखल घेतली जात असून विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कन्हान-पिपरीतील कोणताही नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची नगरपरिषद पूर्ण जबाबदारीने खात्री देत आहे.”
राजेंद्र म.शेंदरे (नगराध्यक्ष, नगरपरिषद कन्हान-पिपरी)

“कन्हान-पिपरी शहरातील पाणीटंचाईची समस्या ही नगरपरिषदेपुढील सर्वाधिक प्राधान्याची बाब आहे. गजभीये ले-आऊट, शिवनगर, इंदिरानगर यांसारख्या भागांमध्ये मागील अनेक वर्षांपासून काही घरांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याची समस्या आहे. अशा ठिकाणी नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळावा म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र केवळ तात्पुरत्या उपायांवर न थांबता ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे.सतरापूर परिसरातील पाणीटंचाईमागे पाईपलाईनच्या तांत्रिक अडचणी हे एक महत्त्वाचे कारण आहे. मच्छी मार्केट परिसरातील जलसाठा सुविधा आणि नवीन पाईपलाईनचे काम पूर्णत्वाकडे जात असून येत्या एक ते दीड महिन्यांत सतरापूर भागातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत करण्याचे नियोजन आहे. यासाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर, फिल्टर प्लांट आणि इतर तांत्रिक सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून अनेक हँडपंप आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे काही भागांमध्ये अतिरिक्त पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तरीदेखील कोणताही नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये, यासाठी नगरपरिषद, प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने समन्वय साधून काम करत आहेत.नागरिकांना सध्या काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असला तरी कायमस्वरूपी उपाययोजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होईल. नागरिकांच्या सहकार्याने ही समस्या लवकरच मार्गी लावण्यात येईल, असा आम्हाला विश्वास आहे.”



