Home Breaking News ओपन कोळसा खाणींच्या काळ्या धुळीत गुदमरतोय कन्हान परिसर आरोग्य, पर्यावरण आणि नागरिकांचे...

ओपन कोळसा खाणींच्या काळ्या धुळीत गुदमरतोय कन्हान परिसर आरोग्य, पर्यावरण आणि नागरिकांचे भविष्य धोक्यात; प्रभावित गावांसाठी विशेष आरोग्य संरक्षण योजनेची मागणी

0
89

ओपन कोळसा खाणींच्या काळ्या धुळीत गुदमरतोय कन्हान परिसर

आरोग्य, पर्यावरण आणि नागरिकांचे भविष्य धोक्यात; प्रभावित गावांसाठी विशेष आरोग्य संरक्षण योजनेची मागणी

कन्हान,ता.०२ – सुनील सरोदे 

नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातील ओपन कोळसा खाणींमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाने नागरिकांचे जीवन अक्षरशः संकटात सापडले आहे. कन्हान, कांद्री, टेकाडी, गोंडेगाव, वराडा, गाडेघाट, जुनी कामठीसह अनेक गावांमध्ये कोळशाच्या काळ्या धुळीचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असून आरोग्य, पर्यावरण आणि भविष्यासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

खाण परिसरातील ब्लास्टिंग, ड्रिलिंग, कोळसा क्रशिंग आणि अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धूलिकण पसरत आहेत. याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत असून घरांचे अंगण, छत, पिण्याचे पाणी, अन्नपदार्थ आणि कपडेही काळ्या धुळीने झाकले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

परिसरात दमा, क्षयरोग, फुफ्फुसांचे विकार, त्वचारोग आणि डोळ्यांचे आजार वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक कुटुंबांमध्ये एकाच वेळी दोन-तीन सदस्य श्वसनविकारांनी त्रस्त असल्याचे चित्र आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना उपचाराचा खर्च परवडत नसल्याने अनेक रुग्ण वेळेवर उपचारांपासून वंचित राहत आहेत.

संग्रहित छायाचित्रे

विशेष म्हणजे, खाणींमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना डब्ल्यूसीएलकडून मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध असताना, त्याच खाणींमुळे प्रदूषणाचा फटका बसणाऱ्या आसपासच्या गावांतील नागरिकांना कोणतीही कायमस्वरूपी आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रभावित गावांसाठी स्वतंत्र “आरोग्य संरक्षण योजना” राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

संग्रहित छायाचित्र

पर्यावरणीय हानीही तितकीच गंभीर आहे. कोळशाच्या धुळीमुळे पिकांचे उत्पादन घटत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. झाडांची पाने काळवंडत असून विहिरी आणि पाण्याचे स्रोत दूषित होत असल्याने पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पशुधन आणि जैवविविधतेवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रदूषित वातावरणामुळे नागरिकांना सकाळच्या फिरण्याचा, प्राणायाम आणि योगासारख्या आरोग्यदायी उपक्रमांचाही अपेक्षित लाभ मिळत नाही. उलट प्रत्येक श्वासासोबत सूक्ष्म धूलिकण शरीरात जात असल्याने भविष्यात गंभीर आजारांचा धोका वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रभावित गावांमध्ये तातडीने आरोग्य सर्वेक्षण, मोफत वैद्यकीय शिबिरे, फुफ्फुस तपासणी केंद्रे, आरोग्य विमा योजना आणि प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमित हवा गुणवत्ता अहवाल जाहीर करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.

रोजगार, उद्योग आणि विकासाला विरोध नसल्याचे स्पष्ट करताना नागरिक म्हणतात, “विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि मुलांच्या भवितव्याच्या किंमतीवर नाही.” त्यामुळे कन्हान परिसरातील हजारो नागरिकांचा एकच प्रश्न आहे . “आम्हाला स्वच्छ हवा, सुरक्षित जीवन आणि समान आरोग्य हक्क मिळणार की नाही?”

हा प्रश्न केवळ कन्हान परिसरापुरता मर्यादित नसून औद्योगिक विकास आणि पर्यावरणीय समतोल यांच्यातील संघर्षाचे गंभीर वास्तव अधोरेखित करणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here