कन्हानमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
कन्हान व कांद्री शहर विकास मंचच्या संयुक्त विद्यमाने दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात
कन्हान, ता.२८
कन्हान शहर विकास मंच आणि कांद्री शहर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. जुने कन्हान पोलीस स्टेशन परिसरातील शिवपंचायत हनुमान मंदिर, गांधी चौक येथे आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ. विशाखा ठमके या होत्या, तर ज्येष्ठ शिक्षक व संचालक पी. जी. खेरगडे तसेच संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी दहावी व बारावी परीक्षेत इंग्रजी आणि मराठी माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा नोटबुक व पेन देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत त्यांचे अभिनंदन केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

“विद्यार्थ्यांनी सातत्याने मेहनत घेत उत्कृष्ट यश संपादन करून कन्हान-कांद्री शहरासह पालक, शिक्षक, शाळा आणि महाविद्यालयाचे नाव अभिमानाने उंचवावे,” असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.








