बॉयपास रोडलगतच्या शेतातील विहिरीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
हत्या की अपघाती मृत्यू?; शवविच्छेदन अहवालानंतरच उलगडणार रहस्य
कन्हान,ता.०४
कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर बायपास रोड व नागपूर-हावडा रेल्वेमार्गालगत असलेल्या खंडाळा शिवारातील एका शेतातील विहिरीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिला अल्पवयीन की प्रौढ, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसून पोलीस तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ४) दुपारच्या सुमारास शेतमालक रमेश अग्रवाल यांच्या शेतातील निर्जन विहिरीत एक मृतदेह तरंगताना शेजारील गोट फार्मचे मालक विनोद यादव यांच्या मजुराच्या निदर्शनास आला. याबाबत तातडीने कन्हान पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.






