Home Breaking News हरित कन्हानच्या दिशेने आणखी एक पाऊल; नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांच्या पुढाकारातून भव्य...

हरित कन्हानच्या दिशेने आणखी एक पाऊल; नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांच्या पुढाकारातून भव्य वृक्षारोपण

0
119

हरित कन्हानच्या दिशेने आणखी एक पाऊल; नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांच्या पुढाकारातून भव्य वृक्षारोपण

कन्हान,ता.०६ – सुनील सरोदे 
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कन्हान नगरपरिषदेच्या वतीने तारसा चौक ते गहूहिवरा रोड परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कन्हान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र म. शेंदरे यांच्या पुढाकारातून आणि स्वखर्चातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे हरित कन्हानच्या संकल्पनेला नवे बळ मिळाले आहे.

पर्यावरण संवर्धन हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून ती सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांनी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करताना झाडांचे संगोपन आणि संवर्धन यालाच खरे महत्त्व असल्याचे अधोरेखित केले.

विशेष बाब म्हणजे राजेंद्र शेंदरे हे दरवर्षी स्वतःच्या खर्चाने वृक्षारोपण करून झाडांची नियमित देखभाल करतात. पाणीपुरवठा, खत, खुरपणी तसेच झाडे मोठी होईपर्यंत त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही ते स्वतः पार पाडतात. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून अनेक नागरिकांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणा मिळत आहे.
या प्रसंगी भाजपा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष सुनंदा दिवटे, गटनेते मनोज कुरडकर, बांधकाम सभापती केतन भिवगडे, कन्हान मंडळ अध्यक्ष बिरेंद्र सिंग, शहराध्यक्ष महेंद्र साबरे, सभापती प्रशांत पाटील, नगरसेवक शिवशंकर (चिंटू) वाकूडकर, विनोद किरपान, सभापती योगिता भलावी, नगरसेविका सुषमा चोपकर, मोनिका पौनिकर, प्रियंका ठाकूर तसेच कैलास खंडार, आकाश महातो, लकी ठाकूर, दीपानकर गजभिये यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे म्हणाले, “वृक्ष हेच जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. भावी पिढ्यांना स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.”
दरम्यान, कन्हान शहराच्या सौंदर्यीकरणासाठी तारसा रोड ते गहूहिवरा रोड मार्गावर आमदार आशिष जयस्वाल यांच्या सहकार्याने आकर्षक विद्युत रोषणाईयुक्त पोल, मध्यभागी डिव्हायडर आणि त्यावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. या मार्गाचे रूपांतर भविष्यात हरित व सुशोभित सेल्फी पॉईंटमध्ये होणार असून नागरिकांसाठी हा परिसर आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. पर्यावरणपूरक विकास आणि शहराच्या सौंदर्यीकरणाचा सुंदर संगम या प्रकल्पातून पाहायला मिळणार आहे.
एक वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा” आणि “हरित कन्हान – स्वच्छ कन्हान” या संदेशांसह कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाची गरज अधोरेखित करणारा हा उपक्रम कन्हानकरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here