Home Breaking News खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या पुढाकाराने ‘भाई आया रे गॅस सिलेंडर’ गीताची विदर्भात...

खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या पुढाकाराने ‘भाई आया रे गॅस सिलेंडर’ गीताची विदर्भात जनजागृती गॅस ग्राहकांच्या सुरक्षेसाठी केंद्र व राज्य सरकारकडे गीत अनिवार्य करण्याची मागणी

0
61

खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या पुढाकाराने ‘भाई आया रे गॅस सिलेंडर’ गीताची विदर्भात जनजागृती

गॅस ग्राहकांच्या सुरक्षेसाठी केंद्र व राज्य सरकारकडे गीत अनिवार्य करण्याची मागणी

कन्हान,ता.१५ – सुनील सरोदे 

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या सुरक्षित वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन तर्फे तयार करण्यात आलेल्या ‘भाई आया रे गॅस सिलेंडर’ या सुरक्षा गीताचा प्रभाव आता विदर्भभर दिसून येत आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस वितरण वाहनांवर हे गीत वाजवले जात असून, त्यामुळे ग्राहकांमध्ये सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

नागपूरमध्ये BPCL तसेच IOCLच्या काही वितरण वाहनांवर हे गीत वाजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाला ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून गॅस वापराबाबत नागरिक अधिक सजग होत असल्याचे दिसून येत आहे.
या गीताच्या माध्यमातून गॅस गळती झाल्यास कोणती काळजी घ्यावी, सिलेंडर घेताना वजन तपासणे का आवश्यक आहे, अतिरिक्त शुल्कास विरोध कसा करावा यासारख्या बाबींबाबत प्रभावी जनजागृती होत आहे. विशेष म्हणजे, ग्राहक आता गॅस गळती तपासण्यासाठी पाणी टाकण्याऐवजी ‘लिकेज डिटेक्टर’चा आग्रह धरत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, नागपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा कार्यालयांनी या उपक्रमाची दखल घेत तेल कंपन्यांना वितरण वाहनांवर हे गीत वाजवण्याचे निर्देश दिल्याची माहिती ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन ने दिली आहे. गडचिरोलीचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी नुकतेच परिपत्रक जारी करून IOCL, BPCL, तसेच HPCL यांच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना हे गीत अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
या गीताचे अधिकृत प्रकाशन करणारे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत राज्य आणि केंद्र सरकारने हे गीत संपूर्ण देशभर अनिवार्य करण्याची मागणी केली आहे.
“हे गीत गॅस ग्राहकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत प्रभावी माध्यम ठरत आहे. महाराष्ट्राच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राज्यभर हे गीत अनिवार्य करावे. तसेच पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय आणि Petroleum and Natural Gas Regulatory Board यांनी सर्व तेल कंपन्यांना वितरण वाहनांवर हे गीत वाजवण्याचे निर्देश द्यावेत, जेणेकरून ग्राहकांचे संरक्षण होईल आणि काळाबाजाराला आळा बसेल,” असे खासदार बर्वे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या उपक्रमामुळे घराघरात गॅस सुरक्षिततेचे नियम पोहोचत असून संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत होत आहे. तसेच गाणे वाजल्यामुळे ग्राहकांना गॅस वितरण वाहन आल्याची माहिती तत्काळ मिळत असल्याने वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढत असल्याचेही दिसून येत आहे.
विदर्भातून सुरू झालेली ही सुरक्षा जनजागृती मोहीम आता राज्यभर आणि देशभर राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्याने ग्राहक सुरक्षेला नवे बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here