Home Breaking News तेली समाजाच्या वैवाहिक परंपरेला आधुनिकतेची जोड जवाहर विद्यार्थी गृहात ११०० वर-वधूंच्या...

तेली समाजाच्या वैवाहिक परंपरेला आधुनिकतेची जोड जवाहर विद्यार्थी गृहात ११०० वर-वधूंच्या “सुयोग” पुस्तकाचे होणार विमोचन

0
34

तेली समाजाच्या वैवाहिक परंपरेला आधुनिकतेची जोड

जवाहर विद्यार्थी गृहात ११०० वर-वधूंच्या “सुयोग” पुस्तकाचे होणार विमोचन

नागपूर,ता.12 – सुनिल सरोदे 

समाजातील युवक-युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा, पारंपरिक वैवाहिक संस्कृतीला संघटित व्यासपीठ मिळावे तसेच समाजातील सामाजिक ऐक्य अधिक दृढ व्हावे या उद्देशाने जवाहर विद्यार्थी गृह संस्था यांच्या वतीने भव्य वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार दि. १७ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता सिव्हील लाईन्स येथील संस्थेच्या सभागृहात संपन्न होणार आहे.
या मेळाव्यात तेली समाजातील तब्बल ११०० वर-वधूंचा परिचय समाविष्ट असलेल्या “सुयोग” या विशेष पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात येणार असून, समाजाच्या वैवाहिक परंपरेला आधुनिक माहिती व्यवस्थेची जोड देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे मानले जात आहे. समाजातील युवक-युवती, पालक आणि नातेवाईकांना एकाच व्यासपीठावर आणून सामाजिक सलोखा, कौटुंबिक संवाद आणि सांस्कृतिक बांधिलकी अधिक बळकट करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.
संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले “सुयोग” पुस्तक हे समाजासाठी मार्गदर्शक ठरणार असून, विमोचनानंतर हे पुस्तक संस्थेच्या सिव्हील लाईन्स तसेच नंदनवन येथील कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. समाजातील विवाह जुळवणी प्रक्रियेला सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह दिशा देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत समाज संघटन, शैक्षणिक प्रगती आणि सांस्कृतिक जतन यासाठी अशा मेळाव्यांची आवश्यकता अधिक वाढली असल्याचे मत समाज बांधवांकडून व्यक्त होत आहे. युवक-युवतींना सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरणात परिचयाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच समाजातील एकोप्याचा संदेशही या मेळाव्यातून दिला जाणार आहे.
या कार्यक्रमाला इच्छुक वर-वधू, त्यांचे पालक तसेच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शेखर सावरबांधे व मुख्य कार्यवाह गंगाधर काचोरे यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष नरेंद्रकुमार दिवटे, सहकार्यवाह हर्षवर्धन बेले, कोषाध्यक्ष बालानंद टापरे यांच्यासह प्रा. प्रज्ञा बडवाईक, लोकनाथ भुरे, चंद्रकांत ढोबळे, कृष्णा घुगुसकर, विजय (बंडु) मोटघरे, प्रा. डॉ. रमेश पिसे, अनिल साखरकर, प्रकाश तिळगुळे, सुखदेव वंजारी, प्रफुल्ल रेवतकर तसेच वर-वधू परिचय सोहळा समितीचे हरिश जयपुरकर, प्रविण अंबागडे, हरिष दांडेकर, रवि उराडे, देवेंद्र वाडीभस्मे आणि नंदकिशोर थोटे हे परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here