Home Breaking News पारशिवनी तालुक्याचा दहावीचा निकाल ९२.३६ टक्के आठ शाळांचा शंभर टक्के निकाल; इंग्रजी...

पारशिवनी तालुक्याचा दहावीचा निकाल ९२.३६ टक्के आठ शाळांचा शंभर टक्के निकाल; इंग्रजी माध्यम शाळांची उल्लेखनीय कामगिरी

0
56

पारशिवनी तालुक्याचा दहावीचा निकाल ९२.३६ टक्के

आठ शाळांचा शंभर टक्के निकाल; इंग्रजी माध्यम शाळांची उल्लेखनीय कामगिरी

कन्हान, ता. ८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पारशिवनी तालुक्याने यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तालुक्यातील २७ शाळांमधून एकूण १ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ हजार ५१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने तालुक्याचा एकूण निकाल ९२.३६ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील आठ शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत गुणवत्ता सिद्ध केली आहे.
यशवंत विद्यालय वराडा, नवप्रतिभा हायस्कूल दहेगाव (जोशी), बीकेसीपी स्कूल कन्हान (इंग्रजी माध्यम), विद्यामंदिर हायस्कूल कामठी कॉलरी खदान क्रमांक ३, अखिलेश हायस्कूल साटक, श्री नारायणा इंग्रजी माध्यम हायस्कूल कन्हान, जि.प. माध्यमिक हिंदी शाळा कोळसा खदान क्रमांक ३ आणि दिल्ली इंग्रजी माध्यम हायस्कूल या शाळांनी शंभर टक्के निकालाची नोंद केली.
यामध्ये बीकेसीपी स्कूल कन्हानने विशेष चमकदार कामगिरी करत १०९ पैकी सर्व १०९ विद्यार्थी उत्तीर्ण केले. त्यापैकी तब्बल ८२ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी मिळविली. श्री नारायणा इंग्रजी माध्यम हायस्कूल कन्हान येथील ११९ पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ६२ विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले. विद्यामंदिर हायस्कूल कामठी कॉलरीनेही ५१ पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले.
तालुक्यातील इतर शाळांमध्येही समाधानकारक निकाल लागले आहेत. धर्मराज विद्यालय कन्हानचा निकाल ९६.८९ टक्के लागला असून १९३ पैकी १८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लालबहादूर शास्त्री विद्यालय बाबुवाडाने ९६.८२ टक्के निकाल नोंदविला. साईनाथ विद्यालय बोरडा आणि सरस्वती न्यू इंग्लिश स्कूल कन्हान यांनी अनुक्रमे ९७.२९ व ९७.३५ टक्के निकाल मिळवत गुणवत्ता कायम ठेवली.
केसरीमल पालीवाल विद्यालय पारशिवनीचा निकाल ९४.२५ टक्के, राणी लक्ष्मी विद्यालय पारशिवनीचा ९४.११ टक्के, राष्ट्रीय आदर्श विद्यालय नवेगाव खैरीचा ९१.१७ टक्के, नूतन सरस्वती विद्यालय टेकाडीचा ९१.३० टक्के, तर श्री नारायणा हिंदी माध्यमिक शाळेचा ९३.१० टक्के निकाल लागला आहे.
बळीराम दखने हायस्कूल कन्हानचा निकाल ८३.१६ टक्के, पं. जवाहरलाल नेहरू हायस्कूल कन्हानचा ८२.९२ टक्के, हरिहर विद्यालय पारशिवनीचा ७९.२० टक्के आणि आदर्श हायस्कूल कन्हानचा ७१.८७ टक्के निकाल लागला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत कारणीभूत असल्याची भावना मुख्याध्यापक व शिक्षकांनी व्यक्त केली. निकाल जाहीर होताच शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला असून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here