Home Breaking News कन्हानकरांचा जगण्याचा प्रश्न टोकावर; पाणीटंचाई-प्रदूषणाने नागरिकांची रोजची जगण्याची झुंज WCL च्या निष्क्रियतेविरोधात...

कन्हानकरांचा जगण्याचा प्रश्न टोकावर; पाणीटंचाई-प्रदूषणाने नागरिकांची रोजची जगण्याची झुंज WCL च्या निष्क्रियतेविरोधात संताप; FIR ची मागणी, प्रशासनावर सवाल

0
71

कन्हानकरांचा जगण्याचा प्रश्न टोकावर; पाणीटंचाई-प्रदूषणाने नागरिकांची रोजची जगण्याची झुंज

WCL च्या निष्क्रियतेविरोधात संताप; FIR ची मागणी, प्रशासनावर सवाल

कन्हान, ता. ५ : सुनील सरोदे 

कन्हान शहरात पाणीटंचाई आणि प्रदूषणाने भीषण स्वरूप धारण केले असून नागरिकांचे जगणेच कठीण झाले आहे. स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा आणि आरोग्य या मूलभूत गरजांसाठी शहरवासीयांना दररोज संघर्ष करावा लागत असून “जगणे म्हणजे रोजची यातना” अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.

नगर परिषद कन्हान-पिपरीच्या वतीने WCL (वेकोली) अधिकाऱ्यांविरोधात थेट गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगराध्यक्ष राजेंद्र मधुकरराव शेंदरे यांनी कन्हान पोलीस स्टेशनला दिलेल्या लेखी तक्रारीत, “CSR अंतर्गत उभारलेली पाणी फिल्टर योजना दोन-तीन वर्षांपासून बंद असून नागरिकांना घाणेरडे पाणी पिण्यास भाग पाडले जात आहे,” असा गंभीर आरोप केला आहे.

विवेकानंद नगर येथील हिराबाई शाळा परिसरात २०१४-१७ दरम्यान उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना सध्या निष्क्रिय अवस्थेत आहे. वारंवार तक्रारी, पत्रव्यवहार आणि क्षेत्रभेटी करूनही WCL प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली गेली नाही. परिणामी, उन्हाळ्याच्या तडाख्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

याचबरोबर वेकोलीच्या कामकाजामुळे निर्माण होणाऱ्या धुळीच्या ढगांनी कन्हान शहर अक्षरशः वेढले आहे. मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे, उडणारी धूळ आणि प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. घसा, डोळे, श्वसन व हृदयाशी संबंधित आजार वाढल्याची तक्रार नागरिक करत आहेत. घरांच्या छतांवर, वाहनांवर आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवर दररोज धुळीचा थर साचत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

शहरातील बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या असून भूजल पातळी चिंताजनकरीत्या घसरली आहे. नाले आणि जलस्रोतांमध्ये होणारे प्रदूषण परिस्थिती आणखी बिकट करत आहे. अशा स्थितीत CSR अंतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होत आहे.

“नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. पाणीपुरवठा आणि पर्यावरणाची जबाबदारी टाळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा,” अशी ठाम भूमिका नगराध्यक्ष शेंदरे यांनी मांडली आहे.

या प्रकरणाची तक्रार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही करण्यात आली असून त्यांनी याची गंभीर दखल घेत आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, कन्हान पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करण्याचे आश्वासन दिले आहे.

नगराध्यक्षांसह उपाध्यक्ष रिंकेश चवरे, सदस्य योगिता भलावी, विनोद किरपान, प्रशांत पाटील, सुषमा चोपकर, केतन भिवगडे, पुनम राठी, सुचित्रा माटे, शिवशंकर वाकुडकर, प्रियंका बैस, मनोज कुरडकर, आशा माहातो, मोनिका पौनोकर, शक्ती पात्रे, महेंद्र साबरे, सुनंदा दिवटे आदी नगरसेवकांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला.

कन्हानमध्ये पाणी, प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न आता टोकाला पोहोचला असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास नागरिकांचा संताप आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here