२५ वर्षांचा प्रवास पुन्हा उजळला… कन्हानमध्ये २००० बॅचचा भावस्पर्शी स्नेहमेळावा
शिक्षकांविषयी कृतज्ञता, मैत्रीच्या नात्यांचा नव्याने धागा; आनंदाश्रूंनी निरोप
नागपूर, ता. ४ : सुनील सरोदे
आयुष्याच्या धावपळीत हरवलेल्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याचा अविस्मरणीय क्षण कन्हानमध्ये अनुभवायला मिळाला. स्थानिक बाळीराम दाखणे हायस्कूल (विकास) येथील २००० बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र आले आणि शालेय जीवनातील गोड आठवणींना जणू नवा श्वास मिळाला.

स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र जमलेल्या या सहाध्यायांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना बालपणातील निरागस क्षण पुन्हा जगले. फुलांच्या वर्षावात स्वागत, दीपप्रज्वलन आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन करत कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमातील सर्वात भावनिक क्षण ठरला तो शिक्षक सत्काराचा. ज्या गुरुजनांनी आयुष्याला दिशा दिली, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. या वेळी अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. “शाळेने दिलेल्या संस्कारांमुळेच आम्ही आज विविध क्षेत्रात उभे आहोत,” या शब्दांत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी भारतीय सेनेतून सेवानिवृत्त माजी विद्यार्थी सम्राट पगारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सेवेला सलाम करत उपस्थितांनी अभिमान व्यक्त केला.

कार्यक्रमात परिचय सत्राने विशेष रंगत आणली. प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा प्रवास सांगताना यश-अपयशाच्या कथा मांडल्या. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत जीवनातील मूल्यांची जाणीव करून दिली. मनोरंजनात्मक खेळ, सुगम संगीत आणि वृक्षारोपण अशा उपक्रमांनी वातावरण आनंदमय झाले.

शाळेला आवश्यक साहित्य भेट देत “शाळेचे ऋण फेडण्याचा” छोटासा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. शेवटी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन आठवणींची शिदोरी प्रत्येकाच्या हातात देण्यात आली.

स्नेहभोजनादरम्यान हशा, आठवणी आणि भावना यांचा संगम पाहायला मिळाला. मात्र, निरोपाच्या क्षणी २५ वर्षांनंतर पुन्हा दूर होताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

या स्नेहमेळाव्यात डॉ.धिरज कडूकर व प्रवीण गडे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. ज्या वर्गात बसून त्यांनी शिक्षकांकडून ज्ञानार्जन केले, त्याच वर्गात आज पुन्हा बसण्याचा योग आल्याने त्यांच्या भावना अनावर झाल्या. “आज पुन्हा विद्यार्थी म्हणून त्या बाकांवर बसताना जुन्या आठवणी डोळ्यांसमोर तरळल्या,” असे त्यांनी भावुकतेने सांगितले.
शिक्षकांनी दिलेल्या प्रेमळ शिक्षणाची आठवण करत त्यांनी सांगितले की, “आमच्या काळातील शिक्षकांनी केवळ शिक्षणच दिले नाही, तर आयुष्य घडविण्याचे संस्कारही दिले. त्यांनी विद्यार्थ्यांवर अपार प्रेम केले आणि प्रत्येकाला योग्य दिशा दाखवली.”
यावेळी काही माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या शालेय जीवनातील अनुभव, आठवणी आणि आजपर्यंतचा प्रवास त्यांनी शिक्षक व मित्रांसमोर मांडला.
“भविष्यात अशा प्रेमळ, समर्पित आणि विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांची उणीव भासेल,” असे सांगत डॉ. धिरज कडूकर यांनी शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला. त्यांच्या या भावनिक मनोगताने उपस्थितांचे डोळे पाणावले.
कार्यक्रमाचे संचालन सचिन लुहुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन किशोर धोटे यांनी मानले. सुमारे ८० माजी विद्यार्थी कुटुंबासह उपस्थित होते.

या ऐतिहासिक स्नेहमेळाव्याच्या यशासाठी शरद दुधपचारे व प्रवीण गडे यांनी आयोजक म्हणून पुढाकार घेतला. डॉ.प्रीती वैद्य डॉ.मोनिका वर्मा, ॲड. भूषण तिजारे प्रतिभा भोंबे संध्या मेश्राम, ममता मेश्राम, वैशाली वानखेडे, अपर्णा वानखेडे, सुशील सोनटक्के, योगेश डुंबरे, गोपाल मसार, आशिष मुंगले, गणेश कापसे, रोशन तायडे, अमोल साकोरे, दिपक धोटे, अमीत वानखेडे, महेश मानकर पद्माकर बोरकर आदींनी मनापासून परिश्रम घेत हा सोहळा अविस्मरणीय ठरविला.

हा स्नेहमेळावा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर २५ वर्षांच्या नात्यांचा, आठवणींचा आणि कृतज्ञतेचा एक जिवंत इतिहास ठरला.






