पावसाळ्यापूर्वी कांद्री (कन्हान) नगर पंचायतचा स्वच्छता अभियानाला वेग
नाल्यांतील गाळ, कचरा व पाला-पाचोळा हटवून पुराचा धोका कमी करण्याचा प्रयत्न
कन्हान,ता.०८ – सुनील सरोदे
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी तुंबणे आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कांद्री (कन्हान) नगर पंचायतने व्यापक नालेसफाई अभियान हाती घेतले आहे. शहरातील प्रमुख नाल्यांमध्ये साचलेला गाळ, पाला-पाचोळा आणि कचरा जेसीबीच्या सहाय्याने काढून नाल्यांचा प्रवाह सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

पावसाळ्यात अनेकदा नाल्यांमध्ये कचरा व गाळ साचल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी रस्त्यांवर पाणी साचणे, घरांमध्ये पाणी शिरणे तसेच नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर नगर पंचायत प्रशासनाने वेळेपूर्वीच खबरदारी घेत स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

अभियानादरम्यान जेसीबीच्या माध्यमातून नाल्यांमधील गाळ, प्लास्टिक, पाला-पाचोळा आणि इतर कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला. स्वच्छतेमुळे नाल्यांचा प्रवाह मोकळा झाला असून पावसाचे पाणी जलदगतीने वाहून जाण्यास मदत होणार आहे. तसेच डासांची उत्पत्ती कमी होऊन परिसरातील स्वच्छता व आरोग्यदृष्ट्याही सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या स्वच्छता मोहिमेत मुख्याधिकारी सचिन गाढवे, नगराध्यक्ष सुजीत डोमाजी पानतावणे, स्वच्छता सभापती शिवशंकर रामभाऊ चकोले यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामांचा आढावा घेतला. यावेळी उपनगराध्यक्ष धर्मेंद्र सरोदे, सभापती अतुल हजारे, तसेच नगर पंचायतमधील विविध सभापती, नगरसेवक व नगरसेविका यांनीही सहभाग नोंदविला.
नगर पंचायत प्रशासनाने नागरिकांनाही स्वच्छतेच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नाल्यांमध्ये कचरा, प्लास्टिक अथवा इतर टाकाऊ वस्तू टाकू नयेत, तसेच आपल्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
पावसाळ्यापूर्वी राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील निचरा व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून संभाव्य पूरस्थिती आणि आरोग्यविषयक समस्या टाळण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नगर पंचायतच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत स्वच्छ व सुरक्षित कांद्री (कन्हान) घडविण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.





