Home Breaking News सामाजिक बांधिलकीचा आदर्श; अपंग युवकाला मिळवून दिली मालवाहतूक ई-रिक्शा महिला व...

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; अपंग युवकाला मिळवून दिली मालवाहतूक ई-रिक्शा महिला व बालकल्याण सभापती योगिता भलावी (तडसे) यांच्या पुढाकाराने संदीप कभे यांना रोजगाराची नवी दिशा

0
30

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; अपंग युवकाला मिळवून दिली मालवाहतूक ई-रिक्शा

महिला व बालकल्याण सभापती योगिता भलावी (तडसे) यांच्या पुढाकाराने संदीप कभे यांना रोजगाराची नवी दिशा

कन्हान,ता.०८- सुनील सरोदे

 लोकप्रतिनिधी हे केवळ विकासकामांपुरते मर्यादित न राहता समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण कन्हान नगरपरिषदेत पाहायला मिळाले. नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. योगिता ताई भलावी (तडसे) यांनी सामाजिक बांधिलकी जपत अपंगत्व असलेल्या होतकरू युवक संदीप गजानन कभे यांना शासकीय योजनेअंतर्गत मालवाहतूक ई-रिक्शा उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला करून दिला.

संदीप कभे हे शारीरिक अडचणींवर मात करत स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द बाळगून होते. मात्र आर्थिक परिस्थिती आणि साधनांच्या अभावामुळे रोजगाराचे स्थिर साधन उपलब्ध होत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन सभापती योगिता भलावी यांनी संबंधित शासकीय योजनांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संदीप कभे यांना मालवाहतूक ई-रिक्शाचा लाभ मिळाला.

या कार्यात नगरपरिषदेचे सहकारी नगरसेवक महेंद्र साबरे यांनीही मोलाची साथ देत आवश्यक स्तरावर पाठपुरावा केला. दोन्ही लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे संदीप कभे यांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले असून आता ते स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहेत.

ई-रिक्शा मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करत संदीप कभे यांनी सौ. योगिता भलावी आणि नगरसेवक महेंद्र साबरे यांचे मिठाई भरवून आभार मानले. “आज मला केवळ वाहन मिळाले नाही, तर स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळाली आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.या प्रसंगी उपस्थित नागरिकांनीही योगिता भलावी यांच्या सामाजिक जाणिवेचे आणि संवेदनशील कार्यपद्धतीचे कौतुक केले. अपंग, निराधार आणि गरजू घटकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अशाच प्रकारे पुढाकार घेतल्यास अनेक कुटुंबांचे जीवनमान उंचावू शकते, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, समाजातील दुर्बल घटकांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने राबविण्यात आलेला हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारा ठरला आहे. कन्हान परिसरात या कार्याचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here