Home Breaking News कांद्रीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी भाजपचे पालकमंत्र्यांना निवेदन जीव...

कांद्रीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी भाजपचे पालकमंत्र्यांना निवेदन जीव वाचविण्यासाठी वेळेवर उपचारांची गरज; नागरिकांना हक्काच्या आरोग्य सुविधांची अपेक्षा

0
28

कांद्रीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी भाजपचे पालकमंत्र्यांना निवेदन

जीव वाचविण्यासाठी वेळेवर उपचारांची गरज; नागरिकांना हक्काच्या आरोग्य सुविधांची अपेक्षा

कन्हान,ता.०८- सुनील सरोदे 
आरोग्य ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून वेळेवर उपचार मिळणे हा जीवन-मृत्यूचा प्रश्न असतो. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या कांद्री परिसरात अद्यापही सुसज्ज शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना उपचारांसाठी नागपूरसारख्या शहरांवर अवलंबून राहावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्ष, कांद्री शहरच्या वतीने महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर करून कांद्री येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, कांद्री व परिसरातील लोकसंख्या सातत्याने वाढत असताना आरोग्य सुविधांचा विस्तार मात्र अपेक्षित प्रमाणात झालेला नाही. सर्दी, ताप, अपघात, प्रसूती किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना उपचारासाठी नागपूर गाठावे लागते. अनेकदा रुग्णाला वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे.
विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक, महिला, गर्भवती माता आणि लहान मुलांना उपचारासाठी दूरचा प्रवास करावा लागतो. यात वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. अशा वेळी जवळपास शासकीय आरोग्य केंद्र उपलब्ध नसणे ही नागरिकांसाठी चिंतेची बाब असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कांद्री येथे आधुनिक वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका आणि आवश्यक औषधसाठ्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी केली. यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना तातडीचे आणि दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. निवेदन सादर करताना भाजपा कांद्री शहरचे प्रसिद्धी प्रमुख नितेश मुरलीधर कामडे, कामगार आघाडीचे राहुल वंजारी, दिनेश राऊत, तसेच रोशन किरपान, विनोद कोहळे, गणेश किरपान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कांद्री परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र ही केवळ विकासाची मागणी नसून जीवनरक्षक सुविधा आहे. आजार, अपघात किंवा प्रसूतीसारख्या गंभीर प्रसंगी वेळेवर उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे कांद्री येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी ही काळाची गरज असून शासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. “आरोग्य सुविधा हा हक्क आहे, सुविधा नव्हे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here