कन्हानची उपेक्षा की प्रशासनाचा हलगर्जीपणा?; साचलेल्या घाणीमुळे नागरिकांवर आरोग्य संकट
कन्हान,ता.०८ – सुनील सरोदे
शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाघधरे वाडी, विष्णुलक्ष्मी नगर आणि एम.जी. नगर परिसरातील नाल्या, गटारे व कालवे तुडुंब भरले असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांची उत्पत्ती वाढल्याने रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते नयन खोब्रागडे (प्रसिद्धी प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश), नितीन मेश्राम आणि संदीप शेंडे यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन परिसरातील बिकट परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, अनेक दिवसांपासून नाल्यांची नियमित साफसफाई करण्यात आलेली नाही. परिणामी नाल्या, गटारे आणि कालव्यांमध्ये कचरा व दूषित पाणी साचून राहिले आहे. यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे.

विशेष म्हणजे, पावसाळा तोंडावर आलेला असताना अद्यापही नालेसफाईची प्रभावी मोहीम राबविण्यात आलेली नाही. पावसाळ्यात नाल्यांमध्ये पाणी साचल्यास साचलेला कचरा कुजून दुर्गंधी वाढण्यासोबतच डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असूनही संबंधित विभागाकडून अपेक्षित गांभीर्य दाखविले जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

निवेदनाद्वारे प्रशासनाला तात्काळ नाल्यांची साफसफाई, गटारांची दुरुस्ती, कचऱ्याचे ढिगारे हटविणे आणि नियमित कचरा संकलन व्यवस्था सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच “स्वच्छ कन्हान, स्वस्थ कन्हान” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ठोस कृती आराखडा राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.दरम्यान, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत राहिल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. पावसाळ्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना करून नागरिकांना आरोग्य संकटातून दिलासा द्यावा, अन्यथा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात लोकशक्ती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
कन्हान शहरातील स्वच्छता आणि आरोग्याच्या प्रश्नावर प्रशासन आता किती वेगाने आणि प्रभावीपणे पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नागरिकांच्या मते, “कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन आता तरी जागे होऊन शहराच्या मूलभूत समस्या सोडवेल का?” हा प्रश्न आज प्रत्येक कन्हानकर विचारत आहे.




