Home विदर्भ पावसाळ्यापूर्वी मुळ गोंडेगावच्या नाल्यांची स्वच्छता करा सांडपाणी तुंबल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता; ग्रामपंचायतीकडे...

पावसाळ्यापूर्वी मुळ गोंडेगावच्या नाल्यांची स्वच्छता करा सांडपाणी तुंबल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता; ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन

0
21

पावसाळ्यापूर्वी मुळ गोंडेगावच्या नाल्यांची स्वच्छता करा

सांडपाणी तुंबल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता; ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन

कन्हान,ता.०८ – सुनील सरोदे 

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मुळ गोंडेगावातील नाल्यांची दुरवस्था ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मागील वर्षभरापासून नाल्यांची साफसफाई न झाल्याने अनेक ठिकाणी कचरा, गवत, प्लास्टिक आणि माती साचून नाल्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसून दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामपंचायत सचिव यांना लेखी निवेदन देऊन तातडीने नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे.

वेकोलिने बोरडा रोड परिसरात पुनर्वसन करून नवे गोंडेगाव वसविले असले तरी अनेक कुटुंबांना अद्यापही योग्य पुनर्वसन व मोबदला मिळालेला नसल्याने ते मुळ गावातच वास्तव्यास आहेत. मात्र, गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची गेल्या एक वर्षापासून साफसफाई झालेली नसल्याने काही नाल्या पूर्णपणे बंद पडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी गवत, प्लास्टिक आणि कचऱ्याचा खच साचल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर व परिसरात साचत आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, वेकोलीच्या खुल्या कोळसा खदानीमुळे तयार झालेल्या कृत्रिम डोंगर व मातीच्या ढिगाऱ्यांमधून मागील पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात माती वाहून येऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोरील नाली पूर्णपणे बुजली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा थांबला असून यंदा मुसळधार पाऊस झाल्यास नाल्यांतील पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ प्रणय खवले यांनी गावकरी नामदेव हुकुम, हर्ष तेलुते, मनोज गोंडाणे, सिताराम राऊत, विजय ठाकरे, गुलाब राऊत, महेंद्र येसनसुरे, भिमराव मेश्राम, हिराबाई बर्वे, संध्या नेवारे, वंदना गोंळधे, कल्पना इडपाची, संगिता नेवारे, मालाबाई हुमने, सरिता नेवारे, गंगाबाई गजभिये यांच्यासह इतर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच मनीषा दलाल व ग्रामपंचायत सचिव यांना निवेदन सादर केले.

निवेदनात पावसाळ्यापूर्वी मुळ गोंडेगावातील सर्व नाल्यांची तातडीने साफसफाई करून सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था सुरळीत करावी, अन्यथा पावसाळ्यात गावाला जलमय परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या या मागणीवर ग्रामपंचायत प्रशासन कितपत तत्परतेने कार्यवाही करते, याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता न झाल्यास आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here