Home मनोरंजन ‘मी लग्न करणार नाही… मला एकटं राहणं आवडतं’

‘मी लग्न करणार नाही… मला एकटं राहणं आवडतं’

0
108
38 व्या वर्षी ललित प्रभाकरचा स्पष्ट निर्णय

मराठी इंडस्ट्रीतील ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता ललित प्रभाकर आजही असंख्य तरुणींचा क्रश आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ललितने आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. मात्र 38 वर्षांचा असूनही ललितने अद्याप लग्न न केल्यामुळे त्याच्या खासगी आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ललितने लग्न, नातेसंबंध आणि एकटेपणाविषयी अत्यंत प्रामाणिक भूमिका मांडली आहे.

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत ललित प्रभाकर म्हणाला, “मला लग्नसंस्थेविषयी काही अडचणी आहेत. एखाद्या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहायलाच हवं, असं सांगितलं जाणं मला आवडत नाही. आपण अनेक नियम आणि प्रथा केवळ परंपरेमुळे पाळतो. पण समाजातील अनेक गोष्टी चुकीच्या आहेत आणि त्या बंद झाल्याच पाहिजेत.”

लग्न हा सामाजिक दबाव नसून वैयक्तिक निर्णय असावा, असं मत मांडताना तो पुढे म्हणाला, “तुम्ही मला काय केलं पाहिजे हे सांगू नका. लग्न मी लोकांना दाखवण्यासाठी करायचं की स्वतःसाठी? जर दोन व्यक्ती आयुष्यात एकाच टप्प्यावर असतील, एकमेकांसोबत आनंदी असतील, तर लग्न करण्यात काहीच गैर नाही.”

मात्र जेव्हा त्याला थेट प्रश्न विचारण्यात आला की, “तू लग्न करणार आहेस का?” तेव्हा ललितने अत्यंत स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं –
“मी लग्न करणार नाही.”

आपल्या निर्णयामागचं कारण सांगताना तो म्हणाला, “माझ्या चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये मी इतक्या वेळा, इतक्या सुंदर पद्धतीने लग्नाचे विधी साकारले आहेत की आता खऱ्या आयुष्यात ते पुन्हा करण्याची गरज वाटत नाही. कॉलेजमध्ये असताना मी रिलेशनशिप्समध्ये होतो. पण आता मला एकटं राहायला जास्त आवडतं.”

एकटेपणाविषयी बोलताना ललितने सांगितलं की, “मी बराच काळ एकटा राहत असल्यामुळे मला स्वतःची सोबत खूप आवडते. मला एकांत आवडतो.” त्याची ही भूमिका सध्याच्या तरुण पिढीशी जोडणारी असल्याचं अनेकांचं मत आहे.

ललित प्रभाकरने आतापर्यंत ‘आनंदी गोपाळ’, ‘हंपी’, ‘स्माइल प्लीज’, ‘मीडियम स्पाइसी’, ‘झोंबिवली’, ‘आरपार’ यांसारख्या चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच आता त्याच्या स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांमुळेही तो चर्चेत आला आहे.

लग्न, नातेसंबंध आणि वैयक्तिक स्वातंत्र्याबाबत ललितची ही थेट भूमिका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.