दुचाकीच्या अपघातात एक ठार, एक जखमी
सावनेर, ता. १६ : नॅशनल हायवे मार्गावर खानगाव
उड्डाण पुलाजवळ रस्त्यावर पडलेल्या रेतीच्या ढिगाऱ्यामुळे मोटरसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. १६) सायंकाळी ७.१५ वाजता घडली. कवडू नथ्थुजी कुमरे (वय ६०, रा. दुधाळा, तहसील सौसर, जिल्हा छिंदवाडा) असे मृताचे नाव आहे. तर अतुल राजू धुर्वे (वय १८, रा. हेटी, ता. सावनेर) हा जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४० सीएस १२१६ क्रमांकाच्या मोटरसायकलवरून दोघेही सावनेरहून हेटीकडे जात असताना रस्त्यावर पडलेल्या रेतीमुळे मोटरसायकल स्लिप होऊन अपघात झाला. सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी घटनेची माहिती सावनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांना दिली. त्यानंतर उमेश पाटील घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सावनेर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी कवडू नथ्थुजी कुमरे यांना मृत घोषित केले. अतुल राजू धुर्वे याच्यावर उपचार सुरू आहेत.








