चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती उत्साहात; कन्हानमध्ये धम्म रॅली व सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत
कन्हान,ता.२८
येथील सिद्धार्थ कॉलनी बुद्धविहारात केसीएस लामा चॅरिटेबल ट्रस्ट भारत, नागपूर यांच्या वतीने प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

दि. २६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ‘कौन छौन सौनाम लामा चॅरिटेबल ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष भदंत आर्य के.सी.एस. लामा महाथेरो यांच्या हस्ते बोधिसत्व चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, महाकारुणिक तथागत बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून धम्म रॅलीला प्रारंभ करण्यात आला.
धम्म रॅलीने महामार्ग क्र. ४४ मार्गे कन्हान शहरातील विविध भागातून भ्रमण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सद्धम्म बुद्ध विहार रेल्वे स्टेशन रोड, तारसा चौक, गहूहिवरा चौक, पांधण रोड आदी मार्गांवरून जात पुन्हा सिद्धार्थ कॉलनी बुद्ध विहारात रॅलीचा समारोप झाला. रॅलीदरम्यान बौद्ध बांधवांनी शांती, समता आणि बंधुत्वाचा संदेश देत परिसर दणाणून सोडला.






