गोंडेगाव येथे आज वेकोलि तक्रार निवारण शिबिर
नागरिकांच्या विविध समस्यांवर प्रशासनाची थेट सुनावणी; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
कन्हान,ता.१३ – सुनील सरोदे
मौजा गोंडेगाव (ता. पारशिवनी, जि. नागपूर) येथील वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्र अंतर्गत नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, तक्रारी व प्रलंबित मागण्यांच्या निवारणासाठी गुरुवार दि. १४ मे रोजी विशेष तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर वेकोलि गोंडेगाव कॉलनी येथील कम्युनिटी हॉलमध्ये दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान पार पडणार असून प्रशासनाच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये अपेक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, दि. ४ मे २०२६ रोजी मा. महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गोंडेगाव परिसरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये वेकोलि उपक्षेत्राशी संबंधित जमीन विषयक प्रश्न, पुनर्वसन, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा, शासकीय कागदपत्रे तसेच नागरिकांच्या विविध प्रलंबित तक्रारींची नोंद घेण्यात येणार आहे. नागरिकांनी आपली तक्रार अ.क्र., नाव, घर क्रमांक, हरकत व शेरा या स्वरूपात सादर करावयाची असून संबंधित विभागांकडून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
शिबिराला उपविभागीय अधिकारी रामटेक, सार्वजनिक बांधकाम विभाग पारशिवनीचे अधिकारी, खंड विकास अधिकारी, तहसीलदार पारशिवनी, मंडळ अधिकारी, तलाठी गोंडेगाव, वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्राचे उपक्षेत्रीय प्रबंधक, ग्रामपंचायत सचिव तसेच सरपंच उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर थेट समस्या मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, गोंडेगाव येथील तलाठी व ग्रामपंचायत सचिवांना गावामध्ये दवंडी देऊन नागरिकांपर्यंत शिबिराची माहिती पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी, तक्रारी व मागण्या मांडण्याचे आवाहन केले आहे.
सदर शिबिरासंदर्भातील आवश्यक निर्देश मल्लीक विराणी यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिल्याचे समजते. परिसरातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने या शिबिरातून नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.