Home Breaking News वाळू वाहतुकीमुळे सिंगारदीप गाव अंधारात; संतप्त ग्रामस्थांची रेतीघाटावर धाड दोन टिप्पर,...

वाळू वाहतुकीमुळे सिंगारदीप गाव अंधारात; संतप्त ग्रामस्थांची रेतीघाटावर धाड दोन टिप्पर, पोकलेनसह लाखोंचा मुद्देमाल जप्त कन्हान पोलीस स्टेशन व महसूल विभागाच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल

0
61

वाळू वाहतुकीमुळे सिंगारदीप गाव अंधारात; संतप्त ग्रामस्थांची रेतीघाटावर धाड

दोन टिप्पर, पोकलेनसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

कन्हान पोलीस स्टेशन व महसूल विभागाच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल

कन्हान,ता.१५ – सुनील सरोदे 
 सिंगारदीप गावातील वीजवाहिनीला वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा धक्का लागून गावातील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट रेतीघाटावर धाड टाकत सुरू असलेला अवैध वाळू उपसा उघडकीस आणला. या कारवाईत दोन टिप्पर ट्रक, एक पोकलेन मशीन आणि वाळूसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मागील काही दिवसांपासून कन्हान शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सतत सुरू असलेल्या वाळू वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्ते पूर्णपणे खराब झाले असून वाहनचालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या अवैध वाहतुकीमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याने कन्हान पोलीस स्टेशन आणि महसूल विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सिंगारदीप गावालगत वाहणाऱ्या कन्हान नदी पात्रातून काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात वाळू चोरी करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ट्रॅक्टर आणि टिप्परच्या सततच्या वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
गुरुवारी (दि.१४) रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास रेतीघाटाकडे जाणाऱ्या ट्रकचा धक्का जिल्हा परिषद वीजवाहिनीच्या तारेला लागल्याने संपूर्ण गावातील वीजपुरवठा खंडित झाला. यानंतर संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले. सरपंच दिपक इंगोले, सुधीर कुथे, मनोहर दोळके, जीवन दोळके, किशोर दोळके, पांडुरंग दोळके, कृष्ण दोळके, शंकर दोळके, राजाराम दोळके, बाबा अवजे, राकेश टोहने, अशोक टोहने यांच्यासह ग्रामस्थांनी थेट नदीघाट गाठला.
तेथे दोन दहा चक्का टिप्पर ट्रक आणि पिवळ्या रंगाची पोकलेन मशीन नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याचे दिसून आले. मशीनच्या सहाय्याने नदीतील वाळू ट्रकमध्ये भरली जात होती. ग्रामस्थांना पाहताच ट्रक चालक वाहन सोडून पसार झाले, तर पोकलेन चालकाने मशीन झाडीत लपविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.

ग्रामस्थांनी तत्काळ ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कन्हान पोलीस स्टेशन चे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एमएच ४० बीएल ६९९४ आणि एमएच ४० बीएल १११२ क्रमांकाचे दोन टिप्पर ट्रक, पोकलेन मशीन आणि वाळूसह एकूण सुमारे ९० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पुरुषोत्तम राजाराम दोडके यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, केवळ गुन्हा दाखल करून प्रकरण दडपले जाणार की आरोपी, ट्रक चालक, मालक व संबंधित सूत्रधारांना जेरबंद केले जाणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here