Home महाराष्ट्र मुस्लिम मतांना काँग्रेसची जहागिरी समजू नका; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर थेट हल्ला

मुस्लिम मतांना काँग्रेसची जहागिरी समजू नका; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर थेट हल्ला

0
62
– युती तोडल्याचा फटका स्पष्ट

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवरून मोठा राजकीय वाद रंगताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत एक खळबळजनक विधान केलं आहे.


“मुंबईत आम्ही वारंवार काँग्रेसला सांगितलं की मुस्लिम मतांना आपली जहागिरी असल्यासारखं वागू नका. पण त्यांनी आमचं काहीच ऐकलं नाही. निवडणूक निकालानंतर हे स्पष्ट झालं की मुसलमानांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. हिंदू मतदार तर आधीच काँग्रेसपासून दुरावला आहे,” असा थेट आरोप आंबेडकरांनी केला.

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 24 जागा जिंकल्या असून, या नगरसेवकांचा विजय हा पक्षाच्या चिन्हामुळे नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या बळावर आणि प्रतिभेवर झाला असल्याचा दावाही आंबेडकरांनी केला.
तसेच, “आम्ही काँग्रेसला एक मोठी संयुक्त सभा घ्यायचा सल्ला दिला होता. ती झाली असती तर जनतेत मोठा संदेश गेला असता आणि आघाडीला निश्चित फायदा झाला असता,” असंही त्यांनी नमूद केलं.

छत्रपती संभाजीनगरचा निकाल काँग्रेससाठी धक्का

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला अवघी एकच जागा मिळाल्याने काँग्रेसची रणनीती पूर्णपणे फसल्याचं चित्र आहे. एकूण 115 जागांपैकी भाजपने 58 जागांवर विजय मिळवत सत्ता मजबूत केली. तर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला 12, उद्धव ठाकरे गटाला 6, मनसेला 1 आणि असदुद्दीन ओवैसींच्या AIMIM पक्षाने तब्बल 33 जागा जिंकत सर्वांनाच मोठा धक्का दिला. इतरांच्या खात्यात केवळ चार जागा गेल्या.

प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं की, “ज्या जागांसाठी काँग्रेसने आमच्याशी वाद घातला, त्या ठिकाणी त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली. जर छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आमच्यासोबत राहिली असती, तर 40 ते 42 जागा सहज निवडून आल्या असत्या. त्यातील 19-20 नगरसेवक वंचितचे आणि तितकेच काँग्रेसचे असते.”

AIMIMला फायदा, वंचित-काँग्रेस वेगळे पडल्याचा परिणाम

छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आणि वंचित एकत्र न आल्याचा थेट फायदा AIMIM आणि भाजपला झाल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे. अनेक प्रभागांमध्ये काँग्रेसच्या खात्यातील जागांवर भाजप आणि AIMIMने मोठी मुसंडी मारली. वंचितलाही अपेक्षित यश मिळवता आलं नाही. दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर AIMIMला चांगली टक्कर मिळाली असती, असा दावा आंबेडकरांनी केला.

जिल्हा परिषद निवडणुकीवरही मोठं वक्तव्य

दरम्यान, 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबतही प्रकाश आंबेडकरांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
“जिल्हा परिषद निवडणुका आम्ही व्यापक स्तरावर लढत आहोत. आता काँग्रेस आमच्यासोबत येईल, अशी आशा आहे. करारानुसार दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवतील,” असं ते म्हणाले.

तसंच, “इतर पक्षांमध्ये भाजपने घुसखोरी केली असून, भाजपचं इतर पक्षांवर नियंत्रण असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला घवघवीत यश मिळाल्याचा दावाही आंबेडकरांनी यावेळी केला.

एकंदरच, काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभं करत प्रकाश आंबेडकरांनी केलेली ही टीका येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत देणारी ठरत आहे.