Home राजकीय काँग्रेसला मोठा धक्का! नसीमुद्दीन सिद्दीकींचा राजीनामा

काँग्रेसला मोठा धक्का! नसीमुद्दीन सिद्दीकींचा राजीनामा

0
79

72 नेते आणि दोन डझन माजी आमदारांनी पक्ष सोडला

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असताना काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या राजीनाम्यासोबत सुमारे 72 नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून, यामध्ये दोन डझन माजी आमदारांचा समावेश आहे. या घडामोडीमुळे उत्तर प्रदेशातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मलिककार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे आणि प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्याकडे पाठवला आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशात पुनरागमनासाठी प्रयत्नशील असताना हा राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

“पक्षात राहून लढा देऊ शकलो नाही” – सिद्दीकींचा आरोप

राजीनाम्याबाबत बोलताना नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी स्पष्ट केले की, पक्षाच्या कार्यपद्धती आणि अंतर्गत परिस्थितीमुळे ते अस्वस्थ होते. संघटनेत आपल्या भूमिका आणि सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, राजीनामा देताना त्यांनी कोणत्याही विशिष्ट नेत्यावर थेट आरोप केलेला नाही.

“जातीयवादाविरोधात लढण्यासाठी आलो, पण शक्य झाले नाही”

वरिष्ठ नेत्यांना पाठवलेल्या पत्रात सिद्दीकी यांनी म्हटले आहे की,
“मी काँग्रेस पक्ष आणि त्याच्याशी संबंधित सर्व जबाबदाऱ्यांचा त्याग करत आहे. कृपया माझा राजीनामा स्वीकारावा.”

राजीनाम्यानंतर दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की, जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते, मात्र पक्षात राहून ही लढाई प्रभावीपणे लढता आली नाही. त्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी नमूद केले.

पुढचा राजकीय डाव काय?

नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी स्पष्ट केले आहे की, हा निर्णय पूर्णतः वैयक्तिक आहे. सध्या ते आपल्या सोबत राजीनामा दिलेल्या सर्व नेत्यांशी सल्लामसलत करत आहेत. पुढे कोणत्या पक्षात जाणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नसला, तरी जनतेसाठीची लढाई सुरूच राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

या घडामोडीमुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी काळात उत्तर प्रदेशच्या राजकारणात आणखी मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.