Home विदर्भ ब्रेकिंग | चंद्रपुरात राजकीय भूकंप! काँग्रेसला धक्का, ठाकरे गट–वंचित–अपक्ष भाजपसोबत जाण्याच्या तयारीत

ब्रेकिंग | चंद्रपुरात राजकीय भूकंप! काँग्रेसला धक्का, ठाकरे गट–वंचित–अपक्ष भाजपसोबत जाण्याच्या तयारीत

0
599
चंद्रपूर | प्रतिनिधी

महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेग आला असून, आता महापौरपदाच्या आरक्षण सोडतीनंतर सत्तास्थापनेसाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी अनेक महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी मित्र पक्षांची गरज भासणार आहे. त्यामुळे जिथे भाजपचं संख्याबळ जास्त आहे तिथे सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत, तर जिथे संख्याबळ कमी आहे तिथे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधक एकत्र येताना दिसत आहेत.

मात्र, चंद्रपुरात राजकारणाला अनपेक्षित वळण लागण्याची चिन्हं आहेत. चंद्रपुर महापालिकेत काँग्रेसमध्ये फूट पडल्याने, बहुमताच्या जवळ असतानाही काँग्रेसला सत्तेबाहेर बसावं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याच्या घडामोडीनुसार, शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि दोन अपक्ष नगरसेवक हे भाजप व शिवसेना शिंदे गटासोबत मिळून सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि दोन अपक्ष असे एकूण दहा नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले आहेत. हे नगरसेवक आधी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे. याआधीच या नगरसेवकांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसकडून महापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपदाबाबत कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने, हे सर्व दहा नगरसेवक भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जात आहे. परिणामी भाजप, शिवसेना शिंदे गटाचे 24 नगरसेवक आणि हे 10 नगरसेवक मिळून मॅजिक फिगर असलेला 34 चा आकडा सहज गाठला जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर आता चंद्रपुरात महापौरपद नेमकं कोणाच्या वाट्याला जाणार, तसेच शिवसेना ठाकरे गट, भाजप आणि वंचित बहुजन आघाडी यांची अनोखी युती प्रत्यक्षात येणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.