Home महाराष्ट्र महाराष्ट्र शोकाकुळ! बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; ६ जणांचा...

महाराष्ट्र शोकाकुळ! बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; ६ जणांचा मृत्यू

0
77
बारामती | विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे आणि कणखर नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांचे खाजगी विमान लँडिंगदरम्यान कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या अपघातात अजितदादांसह विमानातील एकूण ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमकी घटना काय?

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज सकाळी ८:१० वाजता मुंबईहून बारामतीसाठी रवाना झाले होते. सकाळी ८:४५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाला तांत्रिक अडचण आली. विमान धावपट्टीच्या जवळच असलेल्या एका शेतात कोसळले आणि क्षणार्धात विमानाने पेट घेतला. विमानाचा स्फोट इतका भीषण होता की, काही वेळातच संपूर्ण विमान जळून खाक झाले.

अपघातातील मृतांची माहिती

या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासोबत असलेले त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, दोन वैमानिक आणि अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. DGCA ने या वृत्ताला दुजोरा दिला असून मृतांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे:

  • अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र)

  • विदिप जाधव (सुरक्षा रक्षक)

  • पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट)

  • कॅप्टन सुमित कपूर (वैमानिक)

  • कॅप्टन शांभवी पाठक (सह-वैमानिक)

पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की,

“अजित पवार हे लोकनेते होते. तळागाळातील जनतेशी त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यांचे अकाली निधन ही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. महाराष्ट्राच्या विकासातील त्यांचे योगदान सदैव लक्षात राहील.”

राजकीय क्षेत्रावर शोककळा

अजितदादांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बारामतीसह राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने बारामतीकडे रवाना झाले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकांसाठी एकत्र आल्या असतानाच ही दुर्घटना घडल्याने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

प्रशासनावर जबरदस्त पकड असलेला आणि ‘दादा’ या नावाने सर्वपरिचित असलेला एक स्पष्टवक्ता नेता हरपल्याची भावना जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे.