Home महाराष्ट्र Ajit Pawar Funeral : सहयोग ते काटेवाडी… अजितदादांना अखेरचा निरोप; कधी, कुठे,...

Ajit Pawar Funeral : सहयोग ते काटेवाडी… अजितदादांना अखेरचा निरोप; कधी, कुठे, किती वाजता होणार अंत्यसंस्कार?

0
87
बारामती | प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे काल (२८ जानेवारी) झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीसह राज्याच्या विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने दाखल होत असून संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाल्याचे चित्र आहे.

बारामती शहरात ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे बॅनर, फलक लावण्यात आले असून वातावरण भावूक झाले आहे.

अंत्यसंस्काराचा सविस्तर कार्यक्रम

अजित पवार यांचे पार्थिव काल रात्री बारामतीतील सहयोग निवासस्थानी ठेवण्यात आले होते. आज पहाटे ते त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे नेण्यात आले.

  • सकाळी ६ ते ९: काटेवाडी येथील निवासस्थानी पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार

  • सकाळी ९ वाजता: काटेवाडीहून पार्थिव रुग्णवाहिकेने ग. दि. मा. सभागृह येथे आणले जाणार

  • सकाळी १० वाजता: ग. दि. मा. सभागृह ते विद्या प्रतिष्ठान मैदान दरम्यान अंत्ययात्रा

  • सकाळी ११ वाजता: विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

व्हीव्हीआयपींची उपस्थिती, कडेकोट बंदोबस्त

या अंत्यविधीसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र व राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते बारामतीत दाखल होत आहेत.
व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बारामती विमानतळासह शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. NDRF चे पथकही तैनात असून सुमारे २ ते ३ लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

व्यापारी वर्गाकडून श्रद्धांजली; पुणे-नाशिकमध्ये कडकडीत बंद

अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या सन्मानार्थ पुणे शहर आणि मार्केट यार्डमध्ये व्यापारी संघटनांनी कडकडीत बंद पुकारला आहे.
तसेच नाशिक बाजार समितीतील सर्व लिलाव व व्यवहार आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता

या भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, उच्च पदस्थ व्यक्तीच्या अपघाती मृत्यूचा नियम लक्षात घेता या प्रकरणाचा तपास सीआयडी (CID) कडे सोपवला जाण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेले अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर काल रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे पोलीस सलामीसह अंत्यसंस्कार करण्यात आले.

बारामती आज शोकमग्न आहे. राज्याने एक अनुभवी, कणखर आणि प्रभावी नेता गमावला असल्याची भावना सर्वसामान्यांपासून राजकीय वर्तुळापर्यंत व्यक्त होत आहे.