Home महाराष्ट्र मोठी राजकीय घडामोड : सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, महाराष्ट्राला पहिल्या...

मोठी राजकीय घडामोड : सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

0
353
मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळणार असून, राज्याच्या राजकीय इतिहासात हा महत्त्वाचा क्षण ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आज दिवसभर वेगवान हालचाली पाहायला मिळाल्या. उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता मुंबईत त्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतली. या बैठकीनंतरच उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर अंतिम निर्णय झाल्याचं समजतं.

उद्या दुपारी दोन वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत गटनेत्याची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी पक्षाने विधीमंडळास अधिकृत पत्र पाठवले आहे. बैठकीस जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार आणि नेते सावधगिरीचा पवित्रा घेत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही आमदार आज रात्रीच तर उर्वरित आमदार उद्या सकाळपर्यंत मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून, दोन्ही नेत्यांमध्ये सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे. उद्याच्या आमदार बैठकीत मांडायचे मुद्दे आणि गटनेत्याची निवड कशी करायची यावर सविस्तर चर्चा सुरू असल्याचं कळतं.

एकूणच, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हं दिसत असून, उद्याचा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात विशेष ठरणार आहे.