Home Breaking News चीनकडे निघालेली एलपीजी जहाजे भारतात वळवली; कॉन्फिडन्स पेट्रोलियमचा धाडसी निर्णय

चीनकडे निघालेली एलपीजी जहाजे भारतात वळवली; कॉन्फिडन्स पेट्रोलियमचा धाडसी निर्णय

0
179

चीनकडे निघालेली एलपीजी जहाजे भारतात वळवली; कॉन्फिडन्स पेट्रोलियमचा धाडसी निर्णय

नागपूर,ता.३१मार्च- सुनील सरोदे

 जागतिक पातळीवरील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर नागपूरस्थित कॉन्फिडन्स पेट्रोलियम लिमिटेडने मोठा धाडसी निर्णय घेत चीनकडे निघालेल्या तब्बल ५० हजार मेट्रिक टन एलपीजीने भरलेल्या दोन जहाजांची खरेदी करून ती भारताकडे वळवली आहेत. या निर्णयामुळे देशातील एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून चीनकडे निघालेल्या या जहाजांबाबत आठवडाभराहून अधिक काळ चर्चेची मालिका सुरू होती. अखेरीस, चिनी खरेदीदाराने ठरवलेल्या किमतीपेक्षा अधिक प्रीमियम देत कॉन्फिडन्स पेट्रोलियमने हा सौदा पूर्ण केला. कंपनीचे अध्यक्ष नितीन खारा यांनी या व्यवहारास दुजोरा दिला असून, सध्या ही जहाजे भारतीय पश्चिम किनारपट्टीवर पोहोचली आहेत. बंदरातील औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर माल उतरवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
                                      संग्रहित छायाचित्र
या खरेदीतून सुमारे ३२ हजार मेट्रिक टन एलपीजी साठा हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कडे दिला जाणार आहे. या साठ्यामुळे तब्बल २२ लाख घरगुती गॅस सिलिंडर भरता येणार असून, उर्वरित साठा कॉन्फिडन्स पेट्रोलियमकडून स्वतःच्या बॉटलिंग प्रकल्पांसाठी व ऑटो एलपीजी केंद्रांसाठी वापरला जाणार आहे.
दरम्यान, हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे कंपनीची दोन एलपीजी वाहून नेणारी जहाजे अडकून पडल्याने पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावर उपाय म्हणून कंपनीने अमेरिकेतील बीबी एनर्जी या संस्थेकडून २२,४०० मेट्रिक टन एलपीजीची खरेदी केली आहे. टेक्सासमधील ह्यूस्टन येथून निघालेले हे जहाज सुमारे २८ दिवसांत भारतात दाखल होणार आहे.
याशिवाय, बांगलादेश व श्रीलंका यांच्यासाठी असलेला एलपीजी साठा घेऊन आलेले आणखी एक जहाज भारतात वळवण्यात आले असून, हा साठा देशांतर्गत गरजांसाठी वापरण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांत इतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांसोबतही पुरवठ्यासंदर्भात करार होण्याची शक्यता आहे.
कॉन्फिडन्स पेट्रोलियम लिमिटेड ही देशातील अग्रगण्य खासगी एलपीजी बॉटलिंग कंपनी असून, नागपूरसह देशभरात ३०० हून अधिक ऑटो एलपीजी स्टेशनद्वारे सेवा पुरवते. जागतिक संकटाच्या काळात कंपनीने दाखवलेली ही तत्परता आणि धोरणात्मक निर्णयक्षमता देशातील ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here