कन्हान परिसरात वाढत्या गो-तस्करीविरोधात संताप
अवैध वाहतूक व पशू क्रूरतेवर तातडीने कारवाईची मागणी; गौ सेवा समितीचे पोलिसांना निवेदन
कन्हान,ता.२९ – सुनील सरोदे
कन्हान व ग्रामीण परिसरात वाढत असलेल्या अवैध गो-तस्करी आणि पशूंवरील क्रूरतेच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकारांना तातडीने आळा घालावा, अशी मागणी गौ सेवा समिती कन्हान क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

समितीने निवेदनात म्हटले आहे की, कन्हान परिसरात रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. या प्रकारामुळे केवळ कायदा व सुव्यवस्थेचाच प्रश्न निर्माण होत नसून समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. परिणामी परिसरातील शांतता आणि सामाजिक सलोखा धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

गो-तस्करांकडून तारसा रोड, निलज, खंडाळा, सिहोरा, सत्रापूर मार्ग, पिपरी गाडेघाट, जुनी कामठी मार्ग तसेच नागपूर – मनसर – जबलपूर महामार्गावरील टोलनाके आणि ग्रामीण रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. वाहनांमध्ये जनावरांना अमानुषपणे कोंबून चारा-पाण्याविना वाहतूक केली जात असल्याने हा गंभीर स्वरूपाचा कायदेशीर गुन्हा असल्याचे समितीने स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पोलिसांनी इतर विभागांच्या सहकार्याने संयुक्त भरारी पथके स्थापन करून अवैध कत्तलखान्यांवर छापेमारी करावी, अशी मागणी समितीने केली आहे. तसेच डायल ११२ हेल्पलाईनवर गो-तस्करी किंवा अवैध कत्तलीबाबत तक्रार प्राप्त होताच तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
समितीने पुढे म्हटले आहे की, गो-तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर आणि टोलनाक्यांवर अचानक नाकाबंदी करून रात्रीची गस्त वाढवावी. तसेच या अवैध कृत्यात सहभागी असलेल्या मुख्य सूत्रधार आणि वाहन मालकांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तस्करीसाठी वापरण्यात येणारी वाहने जप्त करून ती सहजपणे न्यायालयातून सुटणार नाहीत, यासाठीही प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली.
गौ सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या २१ मे २०२६ च्या परिपत्रकानुसार ‘मकोका’सह इतर अजामीनपात्र कलमांखाली कठोर कारवाई करण्याची मागणी केली. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही समितीने दिला आहे.
यावेळी गौ सेवा समिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साई कनोजिया, सचिव लोकेश दमाहे, कन्हान क्षेत्र प्रमुख शुभम बावनकर, सदस्य ओम हजारे, प्रणय वाडीभस्मे, चैतन्य ओझा, ऋषभ बावनकर, दिनेश भाई, तुषार रारैया, हिमांशू हुमाने, रोहित कनोजिया, आकाश कोठारी, प्रशांत सोनोडिया, सुकेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.