Home निवडणूक 2026 याचना नाही, आता रणच! ठाकरेंची डरकाळी मुंबईतून…

याचना नाही, आता रणच! ठाकरेंची डरकाळी मुंबईतून…

0
95
– 5 जानेवारीपासून संयुक्त सभांचा धडाका
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, सर्वांचे लक्ष एका निर्णायक लढतीकडे लागले आहे ती म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड समोर येत असून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच युती करून थेट निवडणूक रणांगणात उतरत आहेत.
‘याचना नाही, आता रण….’ या आक्रमक घोषणेसह येत्या 5 जानेवारीपासून ठाकरे बंधू संयुक्त प्रचारसभांचा धडाका उडवणार आहेत.
मुंबईसाठी निर्णायक लढाई
मुंबई महापालिकेची सत्ता ही केवळ प्रशासकीय नव्हे, तर राजकीय प्रतिष्ठेची लढाई मानली जाते. राज्यात जरी 29 महापालिकांच्या निवडणुका होत असल्या, तरी मुंबई महापालिकेचा निकाल संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय दिशादर्शक ठरणार असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळेच सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी एकत्र येत मुंबई राखण्यासाठी निर्णायक रणनिती आखली असून, संयुक्त सभा, स्वतंत्र दौरे आणि युवा नेत्यांच्या प्रचारातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
5 जानेवारीपासून सभांचा धडाका
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा 5 जानेवारीपासून सुरू होणार आहेत.
मुंबईत पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शिवाजी पार्क येथे तीन मोठ्या संयुक्त सभा होणार असून, या सभांमधून ठाकरे बंधू थेट मुंबईकरांशी संवाद साधणार आहेत.
मुंबईबरोबरच ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर या महापालिका क्षेत्रात प्रत्येकी एक संयुक्त सभा घेण्याचं नियोजन आहे. तसेच नाशिकमध्येही ठाकरे बंधूंची एक महत्त्वाची सभा होणार असल्याची माहिती आहे.
स्वतंत्र सभा आणि युवा नेतृत्व मैदानात
संयुक्त सभांबरोबरच, काही महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतंत्र सभाही घेणार आहेत. यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त महापालिका कव्हर करण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याही संयुक्त प्रचारसभा होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. युवा नेतृत्वाच्या माध्यमातून तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी आणि नाराजी दूर करण्यासाठी दिवसभर हालचाली सुरू आहेत. अर्ज मागे घेतल्यानंतर उद्या संध्याकाळी निवडणूक रिंगणातील अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर प्रचार सभांना अधिक वेग येणार आहे.
मनसे आणि ठाकरे गटातील काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती असून, बंडखोरी रोखण्यात दोन्ही पक्षांना काही प्रमाणात यश आल्याचं सांगितलं जात आहे.
संयुक्त वचननाम्याची तयारी
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज भेटण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध करण्यापूर्वी अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही भेट राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणूक रिंगणात असलेले मनसेचे सर्व उमेदवार सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी उपस्थित राहणार आहेत.
मुंबईत राजकीय वातावरण तापणार
ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली असून, येत्या काही दिवसांत प्रचार अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
रामधारी सिंह दिनकर यांच्या ‘याचना नहीं, अब रण होगा’ या ओळी प्रत्यक्षात उतरवणारा प्रचार पाहायला मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुंबई महापालिकेच्या लढतीत ठाकरे बंधूंची ही रणनिती कितपत यशस्वी ठरणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.