Home Breaking News १० वर्षांच्या चिमुरडीची गळफास घेऊन आत्महत्या; कन्हान हादरले खदान क्रमांक सहा परिसरात...

१० वर्षांच्या चिमुरडीची गळफास घेऊन आत्महत्या; कन्हान हादरले खदान क्रमांक सहा परिसरात शोककळा; कारण अद्याप अस्पष्ट

0
139

१० वर्षांच्या चिमुरडीची गळफास घेऊन आत्महत्या; कन्हान हादरले

खदान क्रमांक सहा परिसरात शोककळा; कारण अद्याप अस्पष्ट

कन्हान, ता.१
शहरातील खदान क्रमांक सहा परिसरात शिवमंदिराजवळ १० वर्षांच्या विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. ३१ मार्च) दुपारी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण कन्हान परिसर सुन्न झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कु. प्रिती ऊर्फ बेटू सत्यनारायण तिवारी (वय १०, रा. खदान क्रमांक सहा) असे मृत मुलीचे नाव आहे. ती नारायणा शाळेत इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होती. हसतमुख, चंचल आणि सर्वांची लाडकी असलेली प्रिती अचानक असे टोकाचे पाऊल उचलेल, यावर कुणाचाही विश्वास बसत नाही.
मंगळवारी महावीर जयंतीनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने प्रिती घरीच होती. दुपारी सुमारे अडीच वाजताच्या सुमारास तिने घरच्यांकडे थंडपेयाची मागणी केली. ‘संध्याकाळी आणून देतो’ असे सांगितल्यानंतर ती काही वेळ खेळायला गेली. घरातील मंडळी आपापल्या कामात व्यस्त असताना प्रितीने घरातील खोलीत जाऊन ओढणीच्या साहाय्याने लाकडी खांबाला गळफास घेतल्याचे उघडकीस आले.
काही वेळानंतर घरच्यांनी शोध घेतला असता प्रिती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. हा प्रकार पाहताच घरात एकच आक्रोश उसळला. “माझ्या लेकराने असं का केलं?” असा हंबरडा फोडत नातेवाईकांचे डोळे पाणावले. कुटुंबीयांनी तिला तत्काळ खाली उतरवून खासगी रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

आई-वडिलांशिवाय वाढलेले बालपण

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, प्रितीच्या लहानपणीच तिच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केली होती, तर वडील नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत होते. त्यामुळे ती आजी-आजोबा व नातेवाईकांच्या सहवासात वाढत होती. कुटुंबीयांकडून तिला आई-वडिलांचे प्रेम मिळत असले तरी तिच्या वागण्यात हट्टीपणा असल्याचेही समोर आले आहे. एखादी गोष्ट लगेच न मिळाल्यास ती रुसून स्वतःला खोलीत कोंडून घेण्याची सवय होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाईल-टीव्हीचा परिणाम?

पोलीस तपासात कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नाही. शवविच्छेदन अहवालातही कोणतीही ठोस बाब समोर आलेली नाही. लहान वयात आईच्या आत्महत्येचा मानसिक परिणाम, तसेच मोबाईल व टीव्हीवरील दृश्यांचा प्रभाव यामुळे प्रितीने अनवधानाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

‘पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे’

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांनी पालक व शिक्षकांना आवाहन केले आहे की, लहान मुलांच्या भावनिक स्थितीकडे विशेष लक्ष द्यावे. त्यांच्या वागणुकीतील बदल समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता मुलांना योग्य मार्गदर्शन व भावनिक आधार देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून निरागस चिमुरडीच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here