Home Breaking News मेन रोडवर दिवसाढवळ्या कुलूप फोडण्याचा प्रयत्न; चहावालीच्या सतर्कतेने चोरी हाणून पाडली

मेन रोडवर दिवसाढवळ्या कुलूप फोडण्याचा प्रयत्न; चहावालीच्या सतर्कतेने चोरी हाणून पाडली

0
221

मेन रोडवर दिवसाढवळ्या कुलूप फोडण्याचा प्रयत्न; चहावालीच्या सतर्कतेने चोरी हाणून पाडली

कन्हानमध्ये पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह; भर चौकात चोरांचा वाढता धाडस

कन्हान, ता. १२ – सुनील सरोदे 

शहरातील वर्दळीच्या तारसा रोडवरील हनुमान नगर परिसरात भर सकाळी अज्ञात चोराने मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, समोरील चहाविक्रेत्या महिलेच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. या घटनेमुळे मुख्य चौकातील रस्त्यावरच पोलिसांचा धाक संपला का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

सीसीटीव्ही कॅमेरात बंदिस्त कुलूप तोडताना

प्राप्त माहितीनुसार, तारसा रोडवरील टेलिफोन ऑफिसजवळ मोहन शिवाजी जाधव यांचे औषध विक्रीचे दुकान आहे. शनिवारी (दि. ११ एप्रिल) सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती दुकानासमोर येऊन दरवाज्याचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करीत होता. सुरुवातीला संशयिताने खिशातून काही वस्तू काढून कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अपयश आल्याने त्याने लांब लोखंडी रॉडच्या साहाय्याने कुलूप तोडले.

याचवेळी समोरील चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या गीताबाई रेवतकर यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ आवाज देत चोराला हटकले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या चोराने घटनास्थळावरून पळ काढला. गीताबाई यांनी तत्काळ दुकानमालक मोहन जाधव यांना आवाज देत नागरिकांना गोळा केले. मात्र, तोपर्यंत चोर पसार झाला होता.

घटनेनंतर परिसरात चोराचा शोध घेण्यात आला, मात्र तो सापडला नाही. दरम्यान, दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयिताने डोक्यावर पिवळी कामगार टोपी घातलेली असून, तो कुलूप तोडताना स्पष्ट दिसत आहे. या फुटेजच्या आधारे मोहन जाधव यांनी कन्हान पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

या घटनेने पोलिसांच्या गस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य रस्त्यावर, तेही सकाळच्या वर्दळीच्या वेळेत असा प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “मेन चौकातच चोरीचा प्रयत्न होत असेल, तर सुरक्षितता कुठे आहे?” असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

कन्हान पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली आहे. मात्र, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शहरात पोलिसांनी गस्त वाढवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here